नायगाव मध्ये चव्हाण परिवाराच्या वतीने २ हजार मजुरांना घरपोच धान्य

नांदेड जिल्हा नायगाव

नायगाव बाजार  : प्रतिनिधी

कोरोनामुळे रोजगार बुडालेल्या नायगाव शहरातील २ हजार मजुरदार व कामगारांच्या मदतीला चव्हाण परिवार धावून आले असून प्रत्येक कुटुंबाला ५ किलो गहू,५ किलो तांदूळ व एक किलोचे तेल पाकीट घरपोच देण्याची व्यवस्था करुन गुरुवारी तातडीने वाटपही केले. चव्हाण परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम उद्योग धंद्यावर पडल्याने यातून कामगार व मजुरदारही सुटले नाहीत. सर्वच व्यवहार ठप्प असल्याने मजुरदारावर मोठे संकट ओढवले आहे. या संचारबंदीच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न कामगारासमोर उभा टाकला आहे.

कामगारांना नायगाव शहरातील बाजारपेठेत बांधकाम, सुतारकाम, रंगकाम, हाँटेल, आठवडी बाजारात,ज्युस सेंटर, प्लंबिंग, हमाली, रिक्षाचालकांना हमखास कामे मिळतात. दिवसाच्या शेवटी ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रोजगार बुडाला आहे कुणीही कामावर बोलवत नाही. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत.

सध्या उदभवलेली परिस्थिती पाहून वसंतराव चव्हाण मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा नगरपंचायतचे उपनराध्यक्ष विजय चव्हाण यांनी माणुसकीचा गहिवर दाखवत नायगाव शहरातील महात्मा फुले काँलनी, जावई नगर, दत्त नगर, अमृत नगर येथील व शहरात इतरत्र राहणाऱ्या जवळपास २ हजार गोरगरीब मजुरदार व कामगारांना ५ किलो गहू,५ किलो तांदूळ व एक किलो चे तेल पाँकीट घरपोच देण्याची व्यवस्था करुन. कुणालाही बाहेर न येवू देता किंवा लाईनमध्ये उभ न करता आपल्या कार्यकर्त्यामार्फत गुरुवारी घरोघरी पोहचविले.

राजकीय नेतेमंडळी कुठल्याही उपक्रम राबवताना बडेजावपणा व गाजावाजा करतात मात्र चव्हाण परिवाराने कुठलाही गाजावाजा न करता सामाजिक जाणिवेतून गुरुवारी हातावर पोट असलेल्यांना मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे शहरात कौतुक होत आहे. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत हातावर पोट असलेल्यांची अवस्था गंभीर झाली असून वंचितांना मदतीचा हात देणे आपले कर्तव्य आहे. या जाणिवेतूनच ही मदत करण्यात आली असल्याचे विजय चव्हाण यांनी सांगितले.

ही मदत देण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्यासह नगराध्यक्ष शरद भालेराव, विजय भालेराव पंढरी भालेराव संजय चव्हाण, माणिक चव्हाण, बालाजी शिंदे विठ्ठल बेळगे, नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक संतराम जाधव, मिथुन भालेराव श्रीकांत भालेराव शंकर चव्हाण यांची उपस्थिती होती. तर घरपोच देण्यात येत असलेले धान्य व्यवस्थित पोहचले पाहिजे यासाठी पोलीस निरीक्षक पडवळ व त्यांची टिम लक्ष ठेवून होती.