11 व 12 एप्रिलचा नरेंद्र महोत्सव कोरोनामुळे स्थगित -ॲड. दिलीप ठाकूर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठया प्रमाणात होत असून त्यामुळे कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अकरा व बारा एप्रिल रोजी नांदेड येथे होणारा नरेंद्र महोत्सव स्थगित करण्यात आल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या गौरवार्थ दरवर्षी नांदेड येथे आयोजित करण्यात येत असलेल्या नरेंद्र महोत्सवात हजारो रसिकांची उपस्थिती असते.दोन दिवसीय हास्य मैफिलीत देशातील नामवंत हास्य व वीर रसाच्या कवींचा सहभाग असल्यामुळे मराठवाड्यातील रसिक या कार्यक्रमाची आवर्जून वाट पहात असतात.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावे असे आवाहन पंतप्रधान यांनी केले आहे . त्यामुळे अशा आपातकालीन परिस्थितीत नरेंद्र महोत्सव घेणे संयुक्तिक होणार नसल्याचा सल्ला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला. त्यामुळे या वर्षी नरेंद्र महोत्सवात होणारे एकविसावे अ. भा. विराट कविसंमेलन, सातवा मराठी हास्य दरबार, नांदेड भूषण पुरस्कार वितरण तसेच सुधाकर पत्र भूषण पुरस्कार पुढे ढकलण्यात आले आहेत. कोरोना ची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर नवीन तारखा जाहीर करण्यात येतील. अकरा व बारा एप्रिल च्या प्रवेशिका सुधारित तारखांना ग्राह्य धरण्यात येणार आहेत.नांदेडचे सुज्ञ रसिक अडचण समजून सहकार्य करतील अशी अपेक्षा संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.