जागेचा अभाव,इमारत मोडकळीस अशा अनेक समस्यांमुळे उंद्री येथील रुग्णाचे बेहाल

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील उंद्री येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत मोडकळीस आली असल्याने व जागेअभावी गेले सहा महिन्या पासून उंद्री येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका वर्गात चालवले जात आहे.या आरोग्य केंद्रात काम करत असलेल्या डॉक्टर व कर्मचारी जिल्हा परिषद शाळेतच बसून काम करत असल्याने रुग्णांना आरोग्य केंद्राबाहेरच उभे राहावे लागते.याच वर्गात एका कोपऱ्याला प्रयोग शाळा व वैद्यकीय अधिका-याची तपासणी खोली तर दुस-या कोप-याला औषधांचा साठा व प्रशासकीय फाइलींचा ढीग साचलेला आहे. दरम्यान, १० बाय १० च्या या आरोग्य उपकेंद्रात रुग्णांना तपासण्याचे काम कसे होत असेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण आहे.

उंद्री(प.दे) येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत पूर्णतः मोडकळीस अाल्या कारणाने जागा सोडावी लागली.त्यामुळे सहा महिन्यापासून हे आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका वर्गात चालवले जात आहे.या आरोग्य उपकेंद्रात उंद्री सह औराळ,लोणाळ,व तीन तांडे पाच हजार लोकांचा समावेश होतो.येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी येथे जागा नाही. त्यामुळे कर्मचा-यांना रुग्णांची सेवा राहिली बाजूला, पण खोलीत बसायचे कसे असा प्रश्न पडलेला असतो.

आरोग्य उपकेंद्रात कोणतीही सुविधा नसल्याने येथे केवळ लहान मुलांचे लसीकरण, किरकोळ जखमांवर औषधोपचार घालण्याचे काम केले जाते. आरोग्य उपकेंद्रात स्वतंत्र रुग्ण तपासणी खोली नसल्याने येथे महिला रुग्ण फिरकतच नाहीत. केवळ ताप, खोकला, सर्दी अशा आजारांवर येथे उपचार होतात. तर, आरोग्य उपकेंद्र असूनही उंद्रीवासीयांना उपचारासाठी देगलूर येथील खाजगी रुग्णालय गाठावे लागते.