महिला दिनी मंग्याळच्या शाळेत महिला जागर

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन क्यादरकुंटे

मुखेड तालुक्यातील मंग्याळच्या जि.प.प्रा.शाळेत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्त्य साधून ‘माता पालक मेळावा संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन व दीप प्रज्वलन करून मेळाव्याची सुरूवात करण्यात आली. पूजा, गायत्री, वैष्णवी, पल्लवी, मनिषा व संजिवनी या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन सर्वांचे शाब्दिक स्वागत केले.
प्रास्ताविकातून शाळेचे मु.अ. वसंतराव कोंडलवाडे यांनी शाळेची प्रगती व विविध शालेय उपक्रमांविषयीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
समुदाय आरोग्याधिकारी डाॅ. शुभांगी सवराते यांनी स्वच्छता विषयक जागरूकता पटवून देताना कोरोना या विषाणूजन्य आजाराविषयी हाच खबरदारीचा उपाय असून घ्यावयाची दक्षता समजावून सांगितली.
आरोग्यविषयक जाणीवा लक्षात आणून देताना आरोग्य सेवक सावंत यांनी बुवाबाजीच्या नादी न लागता वैज्ञानिक दृष्टीकोन जपण्याचे आवाहन केले.
प्रमुख अतिथी मा.लक्ष्मीबाई धनगे यांनी उपस्थित माता पालकांना पाल्यांप्रति जागरूक राहून त्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. महिलांशी संवाद साधताना ओव्यांचा आधार घेतला. साने गुरूजींची करूणादेवी ही कथा सांगून सर्वांना भावनिक केले.
सुरेखा लाठकर यांनी मार्गदर्शनातून माता पालकांना हितगुज साधताना महिलांनी स्वजागृतीचा संदेश दिला. महिलेवर घराचा पाया आधारलेला असतो. म्हणून महिलेच योगदान घर सुधारणेत फार मोलाचं आहे. ज्या महिलांनी पुढाकार घेतला. ती घरं संस्कारक्षम व प्रगतीच्या वाटेवर असतात. हे दाखल्यांसह विशद केले. जिजाऊंच्या पुढाकारामुळेच शिवराय घडल्याचे प्रतिपादन केले.
शिवनंदा माधसवाड यांनी स्त्री-स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून स्त्रियांना समानतेची व सन्मानाची वागणूक मिळणे अपेक्षित आहे. फॅशनच्या नावाखाली थिल्लरपणा होऊ नये. आपल्या वर्तनातून सुदृढ निकोप समाजाची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी सर्व मातांनी आपल्या पाल्यांना वेळोवेळी सजग व सावध करण्याची गरज आहे. याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंग्याळच्या सरपंच भुर्‍याबाई चव्हाण ह्या होत्या. उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हणमंतराव काटशेव यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच महादाबाई चेबळे, आरोग्यसेविका गायत्री जाधव, आरोग्यसेवक सावंत, उपाध्यक्ष विष्णुकांत पिटलेवाड, लक्ष्मण चव्हाण, माधवराव होट्टे लाभले. कार्य मेळाव्यास शंभरेक मातांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सुत्र संचलन एकनाथ डुमणे यांनी केले तर आभार संजय मोरे यांनी मांडले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी संजय कोरे, विठ्ठल जमजाळ, पंढरीनाथ बिरादार, चंद्रकांत गोंड , उत्तम बेंजलवार यांचेसह मनूमावशी पदूमावशी यांनी सहकार्य केले. विचारपीठ सजावट वातावरण निर्मितीसाठी बलभीम वाघमोडे व युवा शक्तीची मोलाची साथ मिळाली.