यशोदामाता पुरस्कार वितरण सोहळ्यावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षासह शिवसेनेचा बहिष्कार निमंत्रण पत्रिकेत खासदार हेमंत पाटील यांचे नाव वगळल्याने केला संताप व्यक्त

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनी यशोदामाता पुरस्कार 2020 वितरित करण्यात येणार आहे .या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून खासदार हेमंत पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याने पुरस्कार वितरण सोहळ्यावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपलवार यांच्यासह शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी कर्तुत्वान महिला कर्मचाऱ्यांचा यशोदामाता पुरस्कार २०२० देऊन गौरव करण्यात येणार आहे . या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली असून या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व अन्य नेत्यांची नावे आहेत. मात्र
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेनेचे वरिष्ठ नेते हेमंत पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे .खा. हेमंत पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मा सतपलवार यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला तर याच वेळी जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या सर्व सदस्यांनीही यशोदा माता पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे आज जाहीर केले . निमंत्रण पत्रिकेवरुन जाणीवपूर्वक खा. हेमंत पाटील यांचे नाव वगळण्यात आले असून शिवसेना या बाबिचा निषेध करते अशी प्रतिक्रिया हे जिल्हा परिषदेच्या पद्मा सतपलवार यांनी व्यक्त केली आहे.