लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन

ठळक घडामोडी राजकारण राष्ट्रीय

लोकसभेत गोंधळ घालणारे सात खासदार निलंबित करण्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या लोकसभेच्या सत्रात काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन करण्यात आलं. गौरव गोगोईसह इतर सात खासदारांवर संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर उन्नीथन, मनिकम टागोर, बेनी बेहनान आणि गुरजीत सिंग औजला यांच्या नावांचा समावेश आहे. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत या खासदारांना त्यांच्या कृतींसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या गोंधळामुळे अखेर सदनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ओम बिर्ला यांनी खासदारांवर निलंबनाची कारवाई केली.

दिल्ली हिंसाचार मुद्द्यावरुन विरोधी पक्षाकडून लोकसभेत प्रचंड गदारोळ करण्यात आला. ज्यामध्ये अध्यक्षांवर कागदपत्रही भिरकावण्यात आली. विरोधी पक्षाच्या खासदारांची ही वागणूक पाहता त्यांना बुधवारी निलंबनाची ताकिदही देण्यात आली. ज्यानंतर पुन्हा गुरुवारी कोरोना व्हायरस आणि दिल्ली हिंसाचाराच्याच मुद्द्यावरुन विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जे पाहता अखेर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं.