कर्जमाफीच्या ज्या गतीने याद्या येताहेत, ते पाहता कर्जमाफीला 460 महिने लागतील : देवेंद्र फडणवीस

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

 

मुंबई : कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने लोटले तरी केवळ 15 हजार शेतकर्‍यांची यादी आली आहे, याच गतीने याद्या येत राहिल्या तर जितका डाटा अपलोड झाल्याची माहिती देण्यात येत आहे, ती यायला 460 महिने अर्थात 38-39 वर्ष लागतील, असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

विधानसभेत आणि त्यानंतर बाहेर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीची जी पहिली यादी प्रसिद्ध झाली ती सुद्धा अपूर्ण आहे. शेतकर्‍यांची निव्वळ फसवणूक केली जात आहे. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील साखळी गावातील एकूण लोकसंख्या 18,000 आहे. या गावात 1821 शेतकरी आहेत आणि यादीत नावे आली आहेत फक्त 193.

राज्यातील सिंचन योजना, पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 25 हजार, 50 हजार एवढेच नव्हे तर दीड लाख रुपये मदत देऊ, असे नेत्यांनी बांधावर जाऊन सांगितले. पण आज कोणतीही मदत न देता निव्वळ फसवणूक केली जात आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न आज अतिशय गंभीर आहे. हिंगणघाटची घटना तर राज्याचे समाजमन सुन्न करणारी आहे. महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सरकारने संवेदनशीलतेने यावर चर्चा करावी आणि कारवाई करावी, अशी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मागणी केली.

आझाद मैदानावर आंदोलन

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर हजारो भाजपा कार्यकर्त्यांसमवेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. राज्यात 400 ठिकाणी आज अशी आंदोलने झालीत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज शेतकर्‍यांचा आवाज बुलंद करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांनी केले. हे नवीन सरकार कसे आहे?

आज वो हुए मशहूर जो कभी काबिल ना थे
मंज़िले उनको मिली जो दौड़ में शामिल ना थे

शिवसेनेने भाजपाचा तर विश्वासघात केलाच. पण, आता किमान शेतकर्‍यांचा विश्वासघात त्यांनी करू नये. अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मदत करू अशा मोठमोठ्या घोषणा नेत्यांनी केल्या. पण, आज केवळ माघारी फिरण्यापलिकडे काहीही होताना दिसत नाही. कर्जमाफीची जी पहिली यादी जाहीर झाली त्यात त्या गावातील 20 टक्के सुद्धा शेतकर्‍यांची नावे नाहीत. स्थगिती आणि चौकशी यापलिकडे हे सरकार जायला तयार नाही. जलयुक्त शिवार सारख्या योजना सुद्धा बंद केल्या जात आहेत. या सार्‍या योजना जनतेच्या मनातील आहेत, त्यामुळे ती सरकारला जाब विचारत आहे. मुंबईकर मेट्रोबाबत विचारणा करीत आहे. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फुटाची घरे देण्याचे आश्वासन राहुल गांधीजी यांनी दिले होते. त्यांचाच पक्ष आणि हे सरकार तेही आश्वासन पाळायला नकार देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान भारतीय जनता पार्टी कधीच सहन करणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.