चहावाला देशाचा पंतप्रधान होणं हे कौतुकास्पद- डोनाल्ड ट्रम्प

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आगमनावेळी त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले. यावेळी मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांनी उपस्थितांना संबोधित केलं. एक चहावाला देशाचा पंतप्रधान होणं हे कौतुकास्पद आहे, असं ते यावेळी म्हणाले आहेत.

‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामधून ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत गरिबीतून बाहेर पडत आहे.  मोदी ज्या प्रकारे देशाला पुढे घेऊन जात आहेत ते निश्चितच प्रेरणादायी आहे, असं ते म्हणाले आहेत.

पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेने तुमच्या महान पंतप्रधानांचे टेक्सासमधील भव्य फुटबॉल स्टेडियमवर स्वागत केले होते. आज अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आमचं स्वागत होत आहे. भारतीय जनतेने जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.