विद्यार्थ्यांनो ज्ञानाची भूक लागू द्या- प्रा. सतीश कुमदाळे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :संदीप पिल्लेवाड

विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायला शिकले पाहिजे,चाकोरी सोडा, सकारात्मक कार्याला लागावे. ज्ञानाला प्रवाहित करा, श्रीमंती आली म्हणुन माजु नका व गरिबी आली म्हणून लाजू नका. एकाग्रता ठेवून अभ्यास करा. चांगले मित्र जोडा.शरीराची भुक अन्न भागवते तर मनाची भुक शिक्षण भागवते आणि हे शिक्षण शिक्षकांबरोबर चांगल्या ग्रंथांमधूनही प्राप्त होते. मनाने दुबळे होऊ नका. इतिहास फक्त महापुरुषांना असतो असे नाही तर आपणही इतिहास घडवु शकतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांना बाबासाहेबांकडून ज्ञानाची भुक होती.आपणासही ज्ञानाची भुक लागु द्या असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पुणे येथील प्रा.सतीश कुमदाळे यांनी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जी. नांदेड येथील स्नेहसंमेलन समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना केले.

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की विद्यार्थ्यांनो आपल्या आईवडिलांची आपल्याकडून मोठी अपेक्षा आहे ही भागविण्याचा प्रयत्न करा.प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहून अर्जुनाची भूमिका पार पाडा.बरेच विद्यार्थ्यी एकलव्याच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.कै.आ. गोविंदरावजी राठोड साहेबांनी मोठ्या कष्टातून ही संस्था उभी केली आहे याचे स्मरण डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्या. चांगली पुस्तके वाचा, चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात मोठे व्हा म्हणजे तुम्हालाही महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून निमंत्रित करण्याचा सन्मान मिळावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्राध्यापक डॉ.व्यंकट चव्हाण यांनी करून स्नेहसंमेलनात घेतलेल्या विविध स्पर्धांचे अहवाल वाचन यावेळी केले व पाहुण्यांचा परिचय दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. पंडित शिंदे व प्रा. डॉ. उमाकांत पदमवार यांनी केले तर आभार आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. बळीराम राठोड यांनी मानले.

मंचावर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रा. अशोक पाटील कार्यालयीन अधीक्षक शिवराज भालके, विद्यार्थी संसद सचिव कु. शिवकन्या कागणे, विद्यापीठ प्रतिनिधी शशिकांत कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.गोविंदराव राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. त्यानंतर स्नेहसंमेलनामध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या शेवटी गद्य व पद्य शेलापागोटे घेण्यात आले. तदनंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.स्नेहसंमेलनात वाद विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आयत्या वेळेचे भाषण, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्वीझ आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.