जीएसटी भवनच्या इमारतीला मोठी आग

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

वैजनाथ स्वामी 

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगी लागण्याचं सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा अशाच दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मोठी आग लागली आहे. आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

आग लागलेल्या इमारतीत जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचीही कार्यालयं आहेत. इमारतीच्या आठव्या व नवव्या मजल्यावर ही आग लागल्याचं कळतं. दोन्ही मजल्यावरील कर्मचाऱ्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आहे. आगीमुळं सर्व्हर रूमचं कुठलंही नुकसान झालं नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक सोडून तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत.

अग्निशमन दिलेल्या माहितीनुसार, ही आग ‘लेव्हल तीन’ची आहे. एका मजल्यावरील लागलेली ही आग आता तीन मजल्यांपर्यंत पसरली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. जीएसटी संदर्भातील कागदपत्रं आगीतून वाचवण्याचं आवाहन अग्निशमन दलापुढं आहे.