शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे- मुख्यमंत्री

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

जळगाव | शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. जळगावच्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही मंचावर उपस्थित होते.

कर मुक्तीची सुरुवात पुढच्या महिन्यात होईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे, कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्याला कायमचं बाहेर काढणारं हे सरकार आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मराठवाडा कायम दुष्काळात अडकला आहे. मात्र, मराठवाड्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठवाड्याला दिवसा वीज आणि पाणी पाहिजे, मालाला भाव पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

माझ्या शपथविधीला पहिल्यांदा प्रतिभाताई (शरद पवारांच्या पत्नी) आल्या, त्यानंतर त्या आज या कार्यक्रमाला आल्या, उद्याच्या पेपरमध्ये पुन्हा येईल महाआघाडीमध्ये अंतर पडलं, पण आमच्या मध्ये बळीराजा सपत्नीक आहे, आमच्या सरकारचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.