झेंडा बदलला पण भूमिका तीच कायम ; संभाजीनगर नावाला पाठींबा – राज ठाकरे

ठळक घडामोडी मराठवाडा महाराष्ट्र राजकारण

 

औरंगाबाद : मी कधीच माझी भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकारांना विरोध हा पूर्वीपासूनच होता. त्यांना हाकलून देण्यातही आमचीच भूमिका महत्त्वाची होती. मशिदीवरील भोंगे बंद केले पाहिजेत ही मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करतोय. जे स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते. त्यांनीतरी असे कधी केले आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. आम्ही फक्त झेंडा बदलला आहे. आमची भूमिका तीच कायम आहे. राजकारणात झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी आम्ही काही केलेले नाही, असे स्पष्ट करत धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

पक्षाचे धोरण आणि झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे हे प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. औरंगाबादमध्ये त्यांनी आम्ही कधीच भूमिका बदललेली नाही. अनेक जण तर आपापल्या भूमिका बदलून सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. तसेच मला हिंदू जननायक म्हणू नका, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे. चांगले बदल झालेच पाहिजेत, असे म्हणत त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला पाठिंबा दिला. सुमारे 5 ते 6 वर्षांपूर्वीच मी हा झेंडा आणला आहे. पण पक्षाचा अधिकृत झेंडा करायचा याची वर्षभरापासून चर्चा सुरु होती. मी हे बोलतोय, यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे, म्हणून आम्ही हे केले आहे, असे नाही. जी भूमिका मांडली ती थेटपणे मांडली. त्यात कुठेही आडपडदा ठेवलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, शरद पवारांशी वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर पुलवामा हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, तो हल्ला दुर्देवी होता. त्यावेळी मी या हल्ल्याबाबत संशय व्यक्त केला. कारण त्यावेळी तसे संशयजन्य पुरावे उपस्थित करण्यात आले होते. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे असला म्हणून काय फरक पडतो, असा प्रश्नही त्यांनी विचारला.