नांदेडमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळ्याने खळबळ ; कोरोनाबद्दल माहिती मिळाल्याने तो स्वत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाला.

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र राष्ट्रीय

 

नांदेड : वैजनाथ स्वामी

चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या ‘कोरोना’ या व्हायरसचा एक संशयित रुग्ण नांदेड शहरात आढळला असून, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या संशयित रुग्णावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हा संशयित काही कामानिमित्त चीनमध्ये गेला होता. त्यानंतर तो भारतात परतला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा तो ‘कोरोना’ निगेटिव्ह निघाला; पण नांदेड शहरात आला तेव्हा त्याला सर्दी, खोकला आणि घशाचा त्रास जाणवू लागला. कोरोनाबद्दल माहिती मिळाल्याने तो स्वत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाला.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. केवळ चीनमधून परत आला आणि आजारी पडला म्हणून या व्यक्तीला कोरोना वॉर्डात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासणी करून त्याचे रक्त आणि थुंकीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. तीन दिवसांत हा अहवाल येईल, असे रूग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.