शरजील इमामच्या पोलसांनी मुसक्या आवळल्या ..आसामला देशापासून तोडण्याची केली होती भाषा

राष्ट्रीय

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) शरजील इमाम या विद्यार्थी नेत्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. शरजीलने हिंसेला चिथावणी देणारे भाषण केले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शरजीलवर कलम 153 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमामवर आरोप आहे की, त्याने 13 जानेवारी रोजी शाहीन बागेत वादग्रस्त भाषण दिले होते. इमामविरुद्ध दिल्लीशिवाय अलिगड आणि आसाममध्येही एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.हा व्हिडीओ समोर आल्यावर त्याच्या अटकेची कारवाई केली जात आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल होताच शरजील इमाम फरार झाला होता. मात्र अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून शाहीनबाग आंदोलनाच्या मागे त्याचाच मेंदू असल्याचे समोर आले आहे. महिलांना पुढे करून आपला अजेंडा राबविण्याचा त्याचा मनसुबा अखेर पोलिसांनी उधळून लावला आहे.

शरजील इमामने आपल्या आक्षेपार्ह भाषणात म्हंटले होते की, दिल्लीचे जनजीवन विस्कळीत व्हावे ही आमची इच्छा आहे. दिल्लीच नव्हे तर जगातील प्रत्येक शहरात चक्काजाम झालाच पाहिजे. देशातील अनेक शहरात मुस्लिम लोक चक्काजाम करू शकतात. मुस्लिमांकडे तेवढी ताकद नाहीये का ?

पुढे बोलताना शरजील म्हणाला उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 30 टक्के आहे. तुमची लोकसंख्या 30 टक्क्याहून अधिक आहे तर या शहरांचे जनजीवन सुरळीत कसे सुरू आहे? तुम्ही शहरात राहणारे आहात, तर शहर बंद करा, अशी चिथावणी त्याने दिली होती. यापूर्वीही शरजीलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात आसामला भारतापासून वेगळं करण्याचं वक्तव्य त्याने केले होते.