शालेय परिपाठात संविधान उद्देशिकेचं वाचन अनिवार्य – ठाकरे सरकरचा निर्णय

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एका निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परिपाठामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. प्रसत्ताकदिनाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला असून राज्यभरातील शालेय परिपाठामध्ये येत्या २६ जानेवारीपासून संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे.

२६ जानेवारी या दिवशी स्वतंत्र भारताने आपल्या संविधानाचा स्वीकार केला होता. यामुळेच भारतामध्ये २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताकदिन म्हणून साजरा केला जातो. येत्या २६ जानेवारी रोजी भारत आपला ७१वा प्रजासत्ताकदिन साजरा करणार असल्याने राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शालेय परिपाठामध्ये संविधान उद्देशिकेच्या वाचनाचा समावेश करण्यात यावा असा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच संविधानिक मूल्य रुजावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शालेय परिपाठामध्ये संविधान उद्देशिकेच्या वाचनाचा समावेश करण्यात यावा असा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र आता राज्यातील ठाकरे सरकारच्या काळात या निर्णयाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.