‘कितीही विरोध करा, सीएए कायदा मागे घेणार नाही’ – अमित शहा

ठळक घडामोडी राष्ट्रीय

लखनऊ: ‘नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) कोणाच्याही विरोधात नाही. या कायद्यामुळं मुसलमानच काय, कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचं नागरिकत्व जाणार नाही. त्यामुळं किती विरोध करायचा आहे तो करा. पण छातीठोकपणे सांगतो, कोणत्याही परिस्थिती हा कायदा मागे घेतला जाणार नाही,’ असं ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं.

सीएए‘च्या समर्थनार्थ लखनऊ येथे घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या यांच्यावरही शरसंधान केले. ‘सीएए’वरून होणाऱ्या हिंसाचाराला हे पक्षच जबाबदार आहेत. या कायद्यामुळं मुस्लिमांचं नागरिकत्व जाईल असा खोटा प्रचार केला जात आहे. पण या कायद्यातील कुठल्याही कलमात तसं असेल तर मला दाखवून द्यावं. राहुल बाबा, ममता दीदी, अखिलेश यादव यांनी आमच्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं.