अधिकाऱ्यांनी फायली दाबून ठेवल्या तर कायदा मोडून काम करु, तुरुंगात जायलाही तयार आहे – बच्चू कडू

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

मुंबई : जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रक्तदान करुन मंत्रालयात पदभार स्वीकारला. मंत्रालयात दालन मिळालं नाही, तर गांधींच्या पुतळ्याखाली बसून काम करेन, असं म्हणत बच्चू कडू यांनी मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतरही आपल्या साधेपणाचं दर्शन (Bachchu Kadu Blood Donation) घडवलं.

 

सिंचन हे महत्त्वाचं खातं आहे. अनेक फायली अधिकाऱ्यांनी दाबून ठेवल्या आहेत. जर त्यांनी काम केलं नाही, तर कायदा मोडून काम करु, तुरुंगात जायलाही तयार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

मंत्रालयात दालन मिळालं नाही, तर काय झालं, कुठेही बसून काम करु, महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली बसून काम करु, मला जागा, बंगला, स्थान याने काही फरक पडत नाही, ते इतरांना हवं असतं, असा टोलाही कडूंनी लगावला.

बच्चू कडू यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या विभागांचं राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूरमधील आमदार आहेत. कडू यांच्या ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रिपद मिळालं आहे. आमदार बच्चू कडू हे रुग्णसेवा आणि अपंगसेवा यासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. मंत्रालयात कामकाज सुरु करणार आहेत.

काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार काय म्हणतात, यावर मी भाष्य करणं योग्य नाही, विरोधक काही म्हणू द्या, सरकार चालवू, आणि जनतेला न्याय देऊ, असं बच्चू कडू म्हणाले. कायदा तोडलात की आम्ही तुम्हाला तोडलंच समजा, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

बच्चू कडू यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी थेट अधिकाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली. कामात वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्याची शिफारस बच्चू कडू यांनी पहिल्याच दिवशी केला. पारधी समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याची फाईल कोणतीही कारवाई न करता प्रलंबित ठेवल्यानंतर त्यांनी संबंधित नायब तहसिलदारांवर थेट निलंबनाची कारवाई केली. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे नायब तहसीलदार सपना भोवते आणि नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.