खून प्रकरणातील फरार आरोपींना सापळा रचून केले जेरबंद ; मुखेड पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / संदिप पिल्लेवाड
            तालुक्यातील मौजे दबडे शिरुर या गावात 10 महिन्यापुर्वी झालेल्या खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना आज दि. ६ जानेवारी रोजी मुखेड पोलीसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवून दिले आहे.
       मौ.दबडे शिरुर ता.मुखेड येथील  संत श्री बाळू मामा देवस्थानच्या सप्ताहाचा समारोप प्रसंगी दि.६ मार्च २०१९ रोजी अगदी शुल्लक वाकडे बोलण्याच्या कारणावरुन  परमेश्वर दिगंबर परसे, गंगाधर दिगंबर परसे, विठ्ठल ज्ञानोबा गोपनर, संतोष नरवटे, सुरेश ग्यानोबा गोपनर, दिगंबर दौलता परसे, चौत्राबाई दिगंबर परसे, ज्ञानोबा कृष्णाजी गोपनर, लक्ष्मीबाई ज्ञानोबा गोपनर, रसिका गंगाधर परसे या सर्व जणांनी मिळून किशन लक्ष्मण गुट्टे (27) या एस.टी. वाहकाला चाकूने त्याच्या पोटात वार करून जखमी केले होते.
त्यावेळी संघमा नामदेव कराळे या युवकाच्या पोटात सुध्दा चाकू मारण्यात आले होते. तानाजी परसे यालाही मारहाण झाली होती. या सर्व परिस्थितीतील जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले असतांना दि.७ मार्च २०१९ रोजी किशन लक्ष्मण गुट्टे याचा मृत्यू झाला. इतर दोन जखमी काही दिवसांनी उपचारानंतर बरे झाले. संगमा कराळेच्या तक्रारीवरुन मुखेड पोलीसांनी खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवने आदी सदरांखाली दहा आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला.
         मुखेड पोलीसांनी त्यावेळी ८ जणांना अटक केली. कायदेशीर दृष्टीकोणातून ९० दिवसांच्या आत अटक आरोपींचे दोषारोप पत्र दाखल करावे लागते. म्हणून पोलीस निरिक्षक नरसींग आकुसकर यांनी ८ जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल करतांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ प्रमाणे सुरेश ज्ञानोबा गोपनर (३२) आणि विठ्ठल ज्ञानोबा गोपनर, या दोन भावांना फरार दाखविले होते. या दोन्ही भावांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय या ठिकाणी अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्ज फेटाळून लावला.
            आज पोलीस निरिक्षक नरसिंग आकुसकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुरेश ज्ञानोबा गोपनर आणि विठ्ठल ज्ञानोबा गोपनर हे दोन्ही भाऊ गावाकडे येणार आहेत त्यानुसार नरसिंग आकुसकर यांनी आपल्या इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह या दोघांना पकडले. या प्रकरणातील 10 महिन्यापासून फरार असलेले दोन्ही भाऊ न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती करून न्यायालयसमक्ष हजर केले असतांना न्यायालयाने या दोघांची रवानगी तुरूंगात केली आहे.