याकूबच्या फाशीला विरोध करणारा ‘देशद्रोही’ आता ठाकरेंचा मंत्री : किरीट सोमय्या

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला विरोध करणारा ‘देशद्रोही’ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ‘देशभक्त’ मंत्री झाला, अशा शब्दात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचा समाचार (Kirit Somaiya on Aslam Shaikh) घेतला आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन टीका केली आहे. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!!!? देशद्रोही आत्ता देशभक्त झाले!!! देशद्रोही अस्लम शेख, आत्ता देशभक्त झाले!!!???’ असं सोमय्यांनी ट्वीट केलं आहे.

‘2015 मधील अधिवेशनात काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजप, शिवसेना आमदारांनी विरोध करत सहा वेळा अधिवेशनाचं कामकाज स्थगित केलं होतं. अस्लम शेख यांना 2015 मधे शिवसेनेने ‘देशद्रोही’ म्हटलं होतं, मात्र तेच आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री झाले’ असं सोमय्या म्हणाले.

याकूब मेमन प्रकरणी काय मागणी?

अस्लम शेख यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 2015 मध्ये पत्र लिहिलं होतं. याकूब मेमनला सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी या पत्रात केली होती. पत्राखाली तत्कालीन आमदार आरिफ खान, अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्यासह काँग्रेसमधील आठ नेत्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला टीकेची झोड सहन करावी लागली होती.