मुखेडचे हेमाडपंथी महादेव मंदीर – एक जागृत देवस्थान

इतर बातम्या ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड
       मुखेड शहराचे पौराणिक नाव मोहनावती नगरी असे आहे. मोहनावती वासियांचे ग्राम आराद्य दैवत वीरभद्र स्वामी यांचे जाज्वल्य मंदीर शोभून दिसते आहे. वीरभद्र स्वामी यात्रेसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातून तसेच कर्नाटक,आंध्रप्रदेश आणि विदर्भातील अनेक जिल्हयातून भावीक यात्रेनिमित्त मोहनावती नगरीत दाखल होतात. 
असे म्हणले जाते की, मोहनावती नगरीत अनेक देव – देवतांनी हजारो वर्षे वास्तव्य केले होते. या नगरीत दशरथ राजाच्या काळातील पौराणिक हेमाडपंथी महादेव मंदीर असून आज तागायत हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात.  मंदिरा पासुन थोडे अंतरावर श्रावण चलमा असून चलम्याच्या आजूबाजूला गवतास श्रावण महीन्यातच गाठी पडतात हे पाहण्यासाठी अनेक भक्तगण गर्दी करतात. मंदीराच्या दक्षिण बाजूस प्रसिद्ध कुंड असून त्यास बारव असेही संबोधले जाते तर त्यास सासा-सूनाची विहीर असेही म्हणतात. विहीर एक जरी असली तरी त्या विहीरीतील पाण्याचे दोन भाग पहाण्यास स्पष्ठ दिसतात. पाण्याची संथ अवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला तरीही पाण्यातील अर्धा भाग स्पष्ठ वेगळा जानवतो. सासा-सूनाची विहीर ही जरी अख्याइका असली तरी विहीरीतील पाणी मात्र वास्तव आहे.
मुखेड मधील या हेमाडपंथी महादेव मंदीराची कथा मात्र रंजक आहे, दशरथ राजा शिकार करण्यासाठी जंगला आला असताना त्याच्या हातून श्रावणबाळ हा आई वडीलांना पाणी आणण्यासाठी चलमा (आज त्या जागेला श्रावण चलमा असे म्हणतात) येथे आला होता पण श्रावणबाळ पाणी घेत असताना पाण्याच्या बुडबुडण्याचा आवाज दशरथ राजाच्या काणी गेला आणि दशरथ राजा जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी आला आहे असे समजून आवाजाच्या दिशेने एका झाडावर बसून त्याने बाण सोडला पण तो थेट श्रावण बाळाच्या काळजात तीर झाला. दशरथ राजा असा एकमेव राजा होता की, तो आवाजाच्या दिशेने बाण सोडत असे व तो न चुकता बरोबर निशाणा साधत असे. दशरथ राजाच्या हातून श्रावणबाळ यांचा मृत्यू झाल्याने पापक्षालनार्थ दशरथ राजाने या ठिकाणी यज्ञ केला व या हेमाडपंथी मंदीरात महादेवाचे शिवलिंग स्थापन केले. तर या मंदीरास दशरथेश्वराचे मंदीर असे ही भाविक संबोधतात. या आख्यायिकेची रामायनातही उल्लेख असल्याचे दिसते. अशी ही मंदीराची कथा आहे. 
           हे मंदीर हेमाडपंथी असून याचे कोरीव व नक्षीकाम काम हे अतिशय उत्कृष्ठ दर्जाचे आहे. या मंदीरास एक मुख्यव्दार असून तर दोन उपव्दार आहेत. मंदीराच्या खांबावर छोटी- छोटी चित्रे हस्तकलेने कोरलेली आहेत. खांबावर आधारशिला आहेत तर छतावरच्या झुंबरावर मोठी किर्तीमुख व कोरी व कामाच्या अनेक पट्या  कोरल्या असून  छतावर अर्धनारीश्वराची मुर्ती कोरली आहे. मंदीर बाहेरुन अनेक मगर, हत्ती, नंदी अशा वाहनावर उभे असलेल्या मात्रकाच्या मुर्ती आहेत. मंदीरामध्ये दत्तमुर्ती नागदेवताची मुर्ती व पार्वती मातेची मुर्ती आहे.
                  या मंदीराच्या बाहयबाजूस नक्षीकाम व कोरीव काम केलेले बहुसंख्य मुर्ती असून त्या रजाकाराच्या काळात छिन्न विच्छीन्न करुन मुर्तीभंग केलेल्याचे त्या काळात केल्याचे सांगितले जाते.  मंदीरात पुर्णाकृती 6  शिला असून त्यापैकी 4 शिला मंदीरात आहेत तर 2 बाहेरील भागात दिसतात. अर्धाकृती 4 शिला आहेत तर त्या आंतरभागात आहेत. आतील सर्व शिला हया एकाच दगडावर आहेत . तर मंदीरातील महादेवाच्या पिंडीच्या वरच्या बाजूस दगडाने कोरीव काम केलेले कमळ असल्याचेे दिसते. संपुर्ण शिलावर कोरीव काम असून त्यामध्ये दशावतारी मुर्ती असल्याचे दिसतात त्यात वराह अवतार, नृसिंह अवतार, मत्स अवतार, कासव अवतार, बौध्द अवतार, कलकी अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, वामन अवतार, व कृष्णा अवतार असे दशावतार मुर्ती खांबावर कोरीव केलेली आहे. तर काही खांबावर सती अवतारांचे 9 रुपांचे दर्शण ही होते. अर्धाकृती खांबावर सेविकांचे चित्र सुध्दा स्पष्ट दिसते तर वरील बाजूस दोन हत्ती असून ते स्वागत करत असल्याचे जानवते. पण या सर्व कलाकृतीला कृत्रिम प्रकारचे कलर लावल्याने त्याचे सौदर्य हे नष्ट झाल्याचे ही दिसून येते. हेमाडपंथी कलाकृतीला सध्याची रंगरंगोटी केल्याने त्याचे वास्तवरुप हरवल्याचे स्पष्ट जानवते. पुर्णाकृती व अर्धाकृती खांबावर विविध देवतांची चित्र रेखाटले असून एक उत्तम हस्तकला कशी असते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे हेमाडपंथी मंदीर होय तर या मंदीरस भेटच दिल्यावरच याची अनुभूती कळेल. 
               तर मंदीराच्या बाहेरील बाजूस जेमतेम 200 ते 250 च्या जवळपास  कोरीव काम केलेल्या अंदाजे अडीच ते तीन फुट उंचीच्या विविध देवी देवतांच्या मुर्ती असून त्यांच्यावर निजामकालीन वार हे स्पष्ट दिसतात. तर मंदीराच्या पश्चिम, दक्षिण व उत्तर या तीनही ठिकाणच्या बाजूस तीन छोटेसे मंदीर केल्याप्रमाणे मुर्ती ठेवण्यासारखी जागा ठेवून उत्तम कलाकुसरीने हस्तकलेनेे रेखाटन केले आहे. तर त्यावर सुंदर असे मुकूट ही तयार केलेले आहे तर त्या मुकुटात विविध प्रकारच्या देवी देवतांच्या 5 ते 6 इंचाच्या मुर्ती व विविध कलाकुसर दिसतात.
तर मंदीराच्या पश्चिम बाजूस श्रावण चलमा असून त्याची सुध्दा दुरावस्था झाल्याचे दिसते. ज्या ठिकाणी श्रावणबाळाने आपला देह त्याग केला त्या ठिकाणची दुरावस्था ही अत्यंत  वाईट झालेली असून त्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचे दिसून येते. त्या ठिकाणचे कधीच पाणी आटत नाही असे म्हणतात पण ते बरोबरही आहे कारण आजपर्यंत त्या श्रावण चलम्याचे पाणी आटले सुध्दा नाही. संपुर्ण मोहनावती ( मुखेड ) नगरी पुर्वी याच श्रावण चलम्याचे पाणी  पित असे तर दुर दुर वरुन नागरीक पाणी घेण्यास याठिकाणी येत असे पण आज याच श्रावण चलम्याचे पाणी शेतीसाठी वापरत असताना दिसून येते तर झालेली पडझड पाहता अशा पौराणिक साहित्याची शासनातील पौराणिक खात्याने सुध्दा दखल अद्याप पर्यंत घेतली नसल्याचे दिसते.
            तर या हेमाडपंथी मंदीरात विविध प्रकारची कोरीव काम असेलेली चित्रे कुठेही व कोणत्याही मंदीरात पाहावयास मिळत नाहीत. गाभा­यात 3 फुट उंचीची घडीव पीडी आहे. मंदीरच्या समोर सभामंडप व पाकशाळा आहे सभामंडपाचा जिर्णोध्दार झाला असून तेथे आष्टाग्रहीचे वेळी 1968 च्या सुमारास यज्ञ झाला होता तर या मंदीरात महाशिवरात्रीला रात्री 12 वाजता पहिली पुजा होते.
             या मंदीराचे ट्रस्ट करण्यात आले असून या मंदीराची एक कमीटी सुध्दा आहे. या कमिटीचे अध्यक्ष बालाजी दिगांबरराव चौधरी असून तर सचिव लक्ष्मण गोविंदराव पत्तेवार हे आहेत. मंदीराच्या बाजूला श्री गजानन महाराज यांचे मदीर असून तर बाजूस श्री साईबाबा चे मंदीर आहे. या हेमाडपंथी महादेव मंदीराचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचे दिसून येते हे मंदीर अर्धाकृती पाया पासुन पुर्ण हेमाडमंथी आहे तर वरच्या बाजूचे मंदीर हे बांधकाम केल्याचे दिसते. तर या मंदीरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी अनेक भाविकांची मागणी आहे. पण आजपर्यंत तरी कोणत्याच लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष गेल्याचे दिसून येत नाही असे दिसून येते. तर या हेमाडपंथी मंदीरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास याचा म्हणावा तसा विकास ही होईल.
     ज्ञानेश्वर डोईजड 
    मुखेड –  7875782377