खासदार डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व अंतरीम जामीन मंजूर

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

प्रतिनीधी : सोलापुर

सोलापूरचे खासदार डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरीम जामीन गुरुवारी २६ मार्च रोजी मंजूर केला आहे .

यापुर्वी सोलापूर जातपडताळणी समितीने डॉ . जयसिध्देश्वर महास्वामीजींचे जातप्रमाणपत्र रद्द करत गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिलेले होते . सदरील आदेशाच्या कार्यवाहीस आणि अंमलबजाणीस मा . मुंबई उच्च न्यायालयाने यापुर्वीच स्थगीती दिलेली होती . असे असतांनाही मा . सत्र न्यायालय सोलापूर यांनी डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज दिनांक २१ मार्च रोजी फेटाळला.

सदरील आदेशा विरुध्द डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे अॅड . अनुप पाटील आणि अॅड . महेश स्वामी यांच्या मार्फत अर्ज दाखल केला . महास्वामीजी यांच्या तर्फे विधीज्ञांनी असे मुददे मांडले की , जातपडताळणी समिती सोलापूर यांच्या जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या आणि गुन्हा नोंद करण्याच्या आदेशाला आणि आदेशाच्या अंमलबजाणीला यापुर्वीच मा . मुंबई उच्च न्यायालयाने स्थगीती दिलेली असल्याकारणाने , सदर आदेशाच्या अनुषंगाने पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया स्थगीत करणे आवश्यक आहे . तसेच महास्वामीजी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर होणे क्रमप्राप्त होते , परंतू सत्र न्यायालयाने चूकीचा निर्णय देत अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे . तहसीलदार अक्कलकोट यांनी जातपडताळणी समितीस पत्र देवून महास्वामीजी यांचे जातप्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून निर्गमीत झाल्याचे कळविलेले आहे . तसेच निवडणूक अधिकारी यांनीही मुळ जातप्रमाणपत्राचे अवलोकन करुन तक्रारदारांच्या तक्रारी यापुर्वीच खारीज केलेल्या आहेत. सर्व कागदोपत्री पुरावे हे शासकीय पुरावे असल्याने त्याबाबतचा आक्षेप मुळातच चुकीचा असल्याने डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य यांच्या विरुध्द कोणताही गुन्हा होवू शकत नाही असा युक्तीवाद करण्यात आला.

सर्व युक्तीवादा नंतर मा . उच्चन्यायालाचे मा . न्यायामूर्ती श्री . एस एस शिंदे यांच्या पिठाने डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना अटकपुर्व अंतरीम जामीन मंजूर केला . डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य यांच्या वतीने अॅड . अनुप पाटील आणि अॅड . महेश स्वामी यांनी युक्तीवाद केला तर त्यांना अॅड . नितिनकुमार स्वामी आणि अॅड . इरेश स्वामी यांनी सहकार्य केले . शासना तर्फे अॅड
एस आर शिंदे यांनी काम पाहीले.