परीक्षा पद्धतीच्या गोंधळाविरोधात एसएफआयचा धिक्कार मोर्चा प्र. कुलगुरू जोगेंद्र बिसेन यांच्या राजीनाम्याची मागणी

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

नांदेड विद्यापीठाने विविध विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा 2019 या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना विचारात न घेता नवीन परीक्षा पद्धत लादली त्यावेळीही संघटनेने आंदोलन करून नवीन परीक्षा पद्धतीला विरोध केला होता. मात्र परीक्षा विभागाची जबाबदारी असणाऱ्या प्र. कुलगुरू यांनी घेतलेली मुजोर भूमिका हीच विविध अभ्यासक्रमातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्‌ध्वस्त करणारी ठरली. परीक्षा विभागाने याच परीक्षेचे परीक्षा चालू असताना सतत चारवेळा वेळापत्रकात बदल केला. मागील काही वर्षांपासून विद्यार्थी हे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे जणूकाही प्रयोगशाळाच झालेली आहे. यात जवळपास 8 प्रकारचे परीक्षा पद्धतीचे प्रयोग झाले आहेत. असे प्रयोग मात्र विद्यार्थ्यांच्याच आयुष्यावर बेतलेले आहेत. अशाच प्रयोगाने लातूर येथील चन्ना बसवेश्वर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनीचा बळी घेतला होता. याला आपण बळी मानायचे की विद्यापीठाने केलेला संस्थात्मक खून? आता यानंतर काही घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार ? विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार परीक्षा विभागाची जबाबदारी असणाऱ्या प्र. कुलगुरू व परीक्षा विभागाला कोणी दिला.

विद्यापीठाने विविध विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा 2019 चा निकाल लावला. तोच दिवस विद्यापीठाच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. कारण विद्यापीठाचा मानबिंदू व केंद्रबिंदू असणारा विद्यार्थीच उद्‌ध्वस्त झाला होता. विविध विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल पाहाता जवळपास 90 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. तर 3 टक्के विद्यार्थ्यांचा निकाल ओवीमध्ये आहे. तर केवळ 7-8 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. याला जबाबदार कोण? परीक्षा विभागाची जबाबदारी असणारे प्र.कुलगुरू की परीक्षा विभाग? एकूणच विद्यापीठाचा कारभार पाहाता विद्यार्थी विरोधी धोरणेच घेतलेले आपणास पहावयास मिळेल.

आजच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची जबाबदारी असणाऱ्या प्र. कुलगुरू यांना निलंबित करा, विद्यापीठातील परीक्षा विभागावर कार्यवाही करा, सध्या चालू असलेली परीक्षापद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे एका दिवसी एकच पेपर घ्या, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन लागू करा, पदवी अभ्यासक्रमाच्या विषयाची एटीकेटी विषय मर्यादा 2 विषयाने वाढ करा, सर्व अनुर्तीण विद्यार्थ्यांची तात्काळ पुर्नपरीक्षा घ्या, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पुनर्मुल्यांकन निशुल्क करा, एम.फिल. प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी असणाऱ्या प्र.कुलगुरू यांनी विद्यापीठ परिसरात केलेली अवैध प्रवेशप्रक्रिया रद्द करून त्यावर कार्यवाही करा, या मागण्यांचे निवेदन मोर्चा काढून विद्यापीठाच्या कुलगुरूंशी शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदनातील काही मागण्या तात्काळ मान्य करून घेतल्या. यावेळी एसएफआयचे राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड, जिल्हाध्यक्ष विजय लोहबंदे, मीना आरसे, स्वप्निल बुक्तरे, शंकर बादावाड, सुमेध सदावर्ते, रत्नदीप कांबळे, सुर्यकांत बडुरे, सुखानंद गायकवाड, विशाल भद्रे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.