पुलवामा शहिदांच्या मुलांसाठी सेहवागने केलं असं काम की तुम्हीही कराल कौतुक

महाराष्ट्र राष्ट्रीय

मुंबई, 14 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याला आज वर्ष पूर्ण होत आहे. पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या एका आतंकवाद्याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीने सीआरपीएफ जवानांच्या बसला टक्कर मारून अपघात घडवला होता. यामुळे झालेल्या स्फोटात 39 जवान शहीद झाले होते तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. देशभरातून या शहीद जवानांना आज श्रद्धांजली वाहिली जातेय. यावेळी माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग याने देखील नेहमीप्रमाणेच वेगळं ट्विट करत पुलवामाच्या भ्याड हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पुलवामा हल्ल्यातील 2 शहिदांच्या मुलांना सेहवागने दत्तक घेतलं आहे. या मुलांना सेहवाग त्याच्या झज्जरमधील सेहवाग इंटरनॅशनल बोर्डिंग स्कुलमध्ये मोफत शिक्षण देखील देत आहे. उत्तरप्रदेशातील इटावा भागातील शहीद जवान राम वकील यांचा मुलगा अर्पित आणि झारखंड राज्यातील रांचीमधील शहीद जवान विजय यांचा मुलगा राहुल या दोघांना सेहवागने दत्तक घेतलं आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना सेहवागने या दोघांबाबत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सेहवागने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘एका वर्षापूर्वी आपल्या शूर जवानांवर हल्ला झाला होता. त्या सर्वांना माझी विनम्र श्रद्धांजली.या फोटोमध्ये फलंदाजी करणारा अर्पित सिंह पुलवामा हल्ल्यातील शहीद रामवकील यांचा मुलगा आहे, तर गोलंदाजी करणारा राहुल शहीद विजय यांचा मुलगा आहे. मी भाग्यवान आहे की ही मुलं माझ्या शाळेत शिकत आहेत.’